Monday, August 27, 2018

बारीक केस कापा.

* उपदेश फक्त मुलांसाठी.

केस एकदम एकदम बारीक कापा. खूपच बारीक, अक्षय खन्नासारखे कापले तर उत्तम.
कारण - खूप जबरी आहे हां.
एकदम बारीक केस कापले की, दाढी वाढलेली लगेच लक्षात येत नाही.

मी बारीक केस कापल्यावर, इतर वेळेला, ४-५ दिवसानींच दाढी कर दाढी कर, असे मागे लागणारे लोक, दीड आठवडा झाला तरी गप्प - आज लक्षात आले यांच्या.

*

Friday, July 27, 2018

मजा करा.

लहान मुलांशी कनेक्ट होण्याचे दोन सोप्पे मार्ग म्हणजे:
१. गोष्टींची टिंगलटवाळी.
२. घाण बोलणे.

उपदेश: दोन्ही आचरणात आणा व मजा करा.

उदा:
मी व माझ्या मुलाने बनवलेली वाक्ये:
आपला मराठी बिग बॉस - आपला गावठी चिली सॉस
संगीत सम्राट, सा रे ग म प - रंगीत चपराक, (गालावर हात ठेवून) अ, आ, इ, ई
तुझ्यात जीव रंगला /चालतयं की - दुधात टोस्ट भिजला, चावतयं की.
कुंकू, टिकली आणि टॅटू - लाडू चकली आणि कडबू
लक्ष्मी सदैव मंगलम - पक्षी सदैव जंगलम
काढा चड्डी, सोडा नळ - शी चोवीस तास (आम्हाला माहिते, दोन चॅनलचे मिक्स आहे)
उघडा फ्रीज, ढापा नीट - काजू माझा

एखादे वाक्य घेवून जोरजोरात म्हणत बसायचे, १५-२० मिनीटे तरी आरामात हसण्यात जातात.
 *

विश्वास.

जर ( तुम्ही धार्मिक असाल तर)
अ = देव
जर (तुम्ही धार्मिक नसाल तर)
अ= विज्ञान
धार्मिक+वैज्ञानिक, निम्मंनिम्मं अशा कॉम्प्लेक्स केसेस नाही हाताळल्यात सध्या. 
(कारण? कारण आपले जग हे बायनरी होत चालले आहे, आणि टायपिंगचा आळस.)

उपदेश:
"अ"वर आणि कंपायलरवर विश्वास ठेवा. त्यांच काम खूप मोठ्ठं आहे, छोट्याछोट्या बग/अडचणींसाठी या दोघांना शिव्या घालू नका. ९९ % वेळा अ आणि कंपायलर बरोबरच असतात.

(ॲक्च्युअली, विज्ञानाला घातल्यात तरी चालेल. स्पेशली मायक्रोबायोलॉजिस्ट, डॉक्टर, गोळविलकर लॅब, वगैरे जेपण कोण जबाबदार आहेत ते, त्यांना- 
माणूस चंद्रावर गेला, अंतराळात ISS बांधलं, पण यालोकांना अजून लगेच सर्दी-खोकला जाईल अशी एक गोळी नाही बनवता आली? काय अर्थ आहे का? 
विज्ञानाकडे सगळी उत्तरं असतात म्हणे, शेंबडावर काय उत्तर आहे?)
*

Thursday, July 26, 2018

नोटीव्हेशनल

मोटीव्हेशनल पुस्तकं वाचलीत तर त्यातले सल्ले स्वत: हवे तेवढे पाळा - कृपया लोकांना समजावू नका, लोकांना महाबोर होते हो.

Wednesday, July 11, 2018

चहा-लिमीट

सलग तीन चहा (का चहे?) पिऊ नयेत.
(बाकी काही प्रॉब्लेम नाही, चौथा प्यावासा वाटतो मग, किती पिणार हो असे?)
*

Tuesday, April 3, 2018

मिडलईस्टमधे राहण्यापेक्षा पाकिस्तानात राहणे परवडले.

मिडलईस्टमधे राहण्यापेक्षा पाकिस्तानात राहणे परवडले.
जी काय परिस्थिती आहे त्यातला आनंद शोधा आणि सुस्कारे टाका पण सुखी रहा.

*

Sunday, April 1, 2018

कधी कधी खोटे बोलावे लागते.

आयुष्यात कधी ना कधी खोटे बोलावे लागतेच. न कचरत बोला. हे बर्‍याच जणांनी पूर्वी सांगितले आहे मीसुद्धा सांगतो. लोभ असावा.

उदाहरणार्थ, आज मंडईत कांदे घेताना, त्या मावशींनी, सुट्टे नाहीत का? असे विचारले. माझ्याकडे होते पण मी नाहीत म्हणालो कारण, कांदेबटाटे घेताना बंदे रुपयेच द्यायचे असतात असा एक अलिखीत नियम आहे. (आले का परत अलिखीत नियम).
 शिवाय मला पुढे कोथिंबीरीला सुट्टे लागणार होते. 
शिवाय++ त्या मावशींच्या पोत्याखाली चिक्कार सुट्टे पैसे दिसत होते.
अशी सगळी कारणमीमांसा असताना, खरे बोलायचे म्हणजे, त्यांना ही सगळी कारणे सांगून, म्हणून मी तुम्हाला सुट्टे पैसे देवू शकत नाही असे म्हणावे लागले असते. काय अर्थ आहे का?
आपला युधिष्ठीर हिरो, कधी मंडईत गेला नसेल.

Sunday, March 11, 2018

म्हणतय ऊंची वाढलीय, खरतर कापड आटलय.

म्हणतय ऊंची वाढलीय, खरतर कापड आटलय.

नेहमी समग्र विचार करायचा प्रयत्न करा. एखाद्या गोष्टीवरून आनंदी वाटण्याआधी कन्फर्म करा की आनंदी वाटण्याजोगी परिस्थिती आहे बाबा खरच. बरेचदा मनुष्य चुकीचे निष्कर्ष काढून आनंदी/दु:खी होतो.

आभारी आहे. शुक्रीया. धन्यवाद. थॅंक्स. डँके. बाकी भाषात तुमचे तुम्ही म्हणा.

Wednesday, March 7, 2018

आधी विचार मग प्रचार.

एखाद्या गोष्टीने तुम्ही उल्हसित झाला असला (एक्साईट) तर ती दुसर्‍याला सांगायच्या आधी शांतपणे विचार करा. शक्यतो असा विचार करा की, तुम्ही तुमचे आर्चएनिमी आहात. (म्हणजे तुम्ही सुपरमॅन असाल तर क्षणभर विचार करा की, तुम्ही लेक्स लुथर आहात.) मग परत चेक करा की -  अजूनही उल्हसितल्यासारखं वाटतयं का? (Are you still excited?) जर अजूनही उल्हसित वाटलं तरंच ज्याला कुणाला तुम्ही ओरिजनली ती गोष्ट सांगायला निघाला होता त्याला ती सांगा.

कळालं ? 

असे केले नाही तर पोपट व्हायची शक्यता आहे. मी किंडलवर मराठी पुस्तके बघत होतो, मराठी नावे रोमन लिपीत लिहिली होती. त्यात मला "डॉन माने" असे पुस्तक दिसले, वि. स. खांडेकरांनी लिहिलेले. मी आई भेटल्यावर अत्युल्हसितावस्थेत तिला हे सांगितले, वर म्हणालो, आयला वाटलं नव्हतं ययाती-बियाती लिहिणार्‍या माणसाने असले गॅंगबिंगवरपण लिहिले असेल. 
तर ती म्हणाली - 
मंदा, (मी मुलगा आहे, मंद मुलाच्या ऐवजी आई, मंदा म्हणाली.) त्या पुस्तकाचे नाव "दोन मने" आहे.

माहितीपत्रक वाचा.

माहितीपत्रक वाचा. हार्पिक, लायझॉल वगैरेवर लिहिलेली माहिती वाचा आणि त्यानुसारच त्या त्या गोष्टींचा वापर करा. 
वर हा उपदेश.

खाली ही पार्श्वभूमी. (पार्श्वभूमी शब्द या परिच्छेदात जेवढा शोभून दिसतो, तेवढा आजतागायत कुठेच शोभून दिसला नसेल. कोणीही लिहलेले परिच्छेद काढा तुम्ही - पार खांडेकर, जीए किंवा श्याम मनोहर वगैरे, चॅलेंज आहे माझं, ओप्पन चॅलेंज.)

मी गेली अनेक वर्षे, संडासात हार्पिक टाकतो आणि लगेच धुतो. (माझे ढुंगण नव्हे, संडास. जनरली मी आधी शी करतो मगच संडास धुतो, रोज धुत नाही - आय मीन संडास)
आज नवीन बाटली काढली(हार्पिकची), सहज म्हणून त्याच्यावर काय लिहिले आहे ते वाचले, तर त्यात असे लिहीलेय की, हार्पिक टाकल्यावर २ मिनीटे थांबा मग धुआ (परत तोच जोक नको)
चला असे करुन बघूया असे मी म्हणालो. असे इथे केवळ लिहीत नाहिये, मी खरेच मोठया आवाजात म्हणालो.
काय सांगू मित्रांनो, (आणि झालच तर मैत्रिणींनो) - नेहमीएवढ्याच मेहनतीत संडास अशक्य स्वच्छ निघाला. You just cannot impagine. You...just...cannot...imagine. (मोहब्बतेंमधे बच्चन शाहरुखला, "सोच कैसे लिया तुमने, कैसे...सोच...लिया असे काहितरी तेच वाक्य मस्त पॉजवार म्हणतो तसे वाचा, You...just...cannot...imagine. नाही ते रायचंद वाल्या पिक्चरमधे. असुदे.)
तर मला अगदी बिफोर/अफ्टर फोटो टाकावेसे वाटत होते फेसबुकवर, पण मी शक्यतो पर्सनल गोष्टी टाकत नाही फेसबुकवर. जोक वाचायचे, व्हिडिओ बघायचे, हसायचं आपलं.

विसरला असला तर उपदेश परत -  गोष्टींवरच्या सूचना वाचा. (वाचत जा किंवा वाचत चला नव्हे, नुसतं वाचा - चालताय, जाताय कुठे आणि, रहदारी मी म्हणते आहे.)

Thursday, February 22, 2018

अजून एक नियम

मोज्याने चष्म्याची काच पुसू नये. (म्हणे) - अपेरंटली, मोजा स्वच्छ असला तरी चालत नाही आणि लोकात वाईट दिसतं.
जगातील असंख्य अलिखीत नियमांपैकी हा एक नियम नव्यानेच कळाला.